इंदापूर : बारामतीत सध्या धमक्यांचा प्रकार सुरू आहे. हा एक डरपोकपणा आहे. धमक्या फोनवर दिल्या जातात, समोरून दिल्या जात नाहीत. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.
इंदापूर येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय जगताप, बारामती ॲग्रोचे राजेंद्र पवार, शरयु फाऊंडेशनच्या शर्मिला पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, भारत मुक्ती मोर्चाचे ॲड. राहुल मखरे, सक्षणा सलगर, भारती शेवाळे, सुभाष गुळवे, विकास खिलारे, सिकंदर बागवान, अनिल ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, ‘पायाखालची वाळू सरकली की, माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागले, तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो. मुंबई, ठाण्याला यायचंय, रस्ता आमचाच आहे. तुम्ही पवारांना धमक्या देताय की शिवसैनिकांना धमक्या देताय, कुणाला धमक्या देताय? धमक्या देऊ नका. आम्ही घाबरणारे लोक नाही. ही मर्दाची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते पळून गेले. तुमच्यात हिंमत असेल तर प्रचार करून निवडून येऊन दाखवा’
तसेच ही लढाई बारामतीची नसून महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. तुमची दादागिरी, दहशतवाद आणि धमक्या, बारामतीचं कुणी गुजरात करू पाहत असेल तर इथं शिवसेनेचा भगवा ठामपणे उभा राहील, असं त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी दोन पक्ष फोडून आलो, पण चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल, सत्ता आमच्याकडे असेल. तुम्ही ईडी, सीबीआयच्या दहशतीवर पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्या हातात येणार आहे. त्यामुळे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पाहा, असा इशाराही राऊतांनी फडणवीसांना दिला.
महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मैदानात उतरा
हर्षवर्धन पाटील हे आमचे मित्र आहेत. त्यांना गेल्या काही दिवसांपासून शांत झोप लागत नसेल. पण त्यांना स्वाभिमान असेल, मराठी म्हणून अस्मिता असेल, महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरु असताना कुठल्याही मराठी नेत्याने आणि माणसाने शांत झोपू नये. जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तुम्ही या मातीतले मराठी म्हणून म्हणवण्यास लायक नाही. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मैदानात उतरा, असं सांगत संजय राऊतांनी हर्षवर्धन पाटलांना सोबत येण्याचं आवाहन केले.
इंदापूरकर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. आगामी काळात इंदापूरकर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील. इंदापूरमध्ये शरद पवार यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. हा तालुका शरद पवार यांच्यावर खूप प्रेम करतो. या इंदापुरात काही राजकीय बदल झाले. या निवडणुकीत काय झालंय काही समजेनासे झाले आहे. मी तीन निवडणुका लढवल्या. मागच्या निवडणुकीत माझ्याविरोधात राहुल कुल यांचं संपूर्ण कुटुंब होतं. मी राहुल कुल आणि त्यांच्या पत्नीचे कौतुक करते की, त्यांनी कधीही पातळी सोडून टीका केली नाही. तिन्ही निवडणुका सुसंस्कृत होत्या. पण या निवडणुकीत काय गडबड झाली ते कळत नाही.
आम्ही सामान्य माणसाच्या सन्मानासाठी लढतोय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘आम्ही सामान्य माणसाच्या सन्मानासाठी लढत आहे. राज्यघटना लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे. विरोधकांवर ईडी लावून अटक केली व काँग्रेस पक्षाचे खाते गोठविले. भाजप दहशतीतून निवडणूक लढवत आहे. मात्र, मतदारांना तुम्ही डांबू शकत नाही. त्यामुळे पुरोगामी विचारांना मतदारांनी मतदान करावे’, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार रोहित पवार, रोहिदास जगताप, किशोर भोसले, आपचे रविराज भाळे, विवेक कोकरे दादासो थोरात, इनायतअली काझी, छाया पडसळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, अमोल भिसे यांनी मनोगते व्यक्त केली. तर स्वागत तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील यांनी केले. तर आभार सागर मिसाळ यांनी मानले.