पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला मागोमाग धक्के देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील समरजित घाटगे, त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि आता पुण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती संजय काकडे यांनी एका माध्यम संस्थेच्या प्रतिनिधींना दिली.
दसऱ्यानंतर होणार प्रवेश :
माजी खासदार संजय काकडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता काकडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं भाजपाला पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजपानं वापर केल्याचा आरोप
काकडे यांचा हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का मानला जात असून, भाजपाला पुणे शहरात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पक्षाकडून काहीही मिळालं नसून, भाजपकडून केवळ वापर झाला असल्याची खदखद काकडे यांनी व्यक्त केली आहे.