लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील “यशवंत” च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापुर्वीच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या पॅनलला मोठा धक्का बसला असुन, “ब” वर्गातील उमेदवार संजय गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.
संजय गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेत असल्याचे जाहीर करतानाच, दुसरीकडे त्यांनी आपला पाठिंबा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे “ब” वर्गातील उमेदवार सागर अशोक काळभोर यांना जाहीर केला आहे. संजय गायकवाड यांच्या माघारीच्या घोषणेमुळे निवडणुकीपुर्वीच सागर अशोक काळभोर यांच्या रुपाने रयत सहकार पॅनलला एका जागेचा बोनस मिळाला आहे.
“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होत असुन, कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन प्रमुख पॅनेलमध्ये किटली व कपबशी या दोन प्रमुख चिन्हांच्या माध्यमातुन लढाई होणार आहे. “ब” वर्ग म्हणजेच उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी या गटातून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलमधुन सागर अशोक काळभोर तर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या पॅनलमधुन संजय सोपानराव गायकवाड हे दोघेजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र प्रचाराचा नारळ फुटण्यापुर्वीच संजय गायकवाड यांनी थेऊरफाटा येथील मॅजेस्टीक हॉटेलमध्ये पत्रकार परीषद घेत, निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेत असल्याची घोषणा केली.
यावेळी संजय गायकवाड यांच्या समवेत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे “ब” वर्गातील उमेदवार सागर अशोक काळभोर, मयूर कदम, कमलेश काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेण्याचा निर्णय़ घेतला असुन, यापुढील काळात सागर काळभोर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पॅनेल प्रमुखांकडून संवाद साधण्यात दिरंगाई झाल्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. मात्र, माधव काळभोर व दिलीप काळभोर यांची कारखाना सुरु करण्यासंदर्भातील धोरणे पटल्याने निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही उद्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना देणार आहे.