भोर : विधानसभेची निवडणूक होती का ईव्हीएम मशिनचे षडयंत्र ? असा प्रश्न उपस्थित करीत भोर मतदारसंघात खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याचा निर्धार मनी बाळगत कामाला सुरुवात केली आहे, असे मत माजी आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांशी केलेल्या गप्पागोष्टीत व्यक्त केले. भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास कार्यालयात माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी निवडणूक निकालाविषयी चर्चा झाली.
याप्रसंगी भोर, वेल्हा, मुळशीतील हजारो कार्यकर्ते माजी आमदार संग्राम थोपटे यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. थोपटे म्हणाले की, निकालाच्या दुसऱ्या दिवशी जनतेचे काम करण्यास सुरुवात केलेली आहे. पुढील काळात निरंतर जनतेसाठी लढत राहणार आहे. पराभव झाला असला तरी खचणार नाही. जनतेसाठी पूर्णवेळ देणार आहे, असे त्यांनी सांगितले.