Sangli Suicide News: सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस येथील अनुगडेवाडीत दोन महिलांकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात संबंधित दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा- भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची अचानक भेट; डॉक्टर व कर्मचारी गोंधळले
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती रमेश अनुगडे हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. दोन कुटुंबांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तीव्र वादावादी झाली. यात काही जणांनी मारामारी करण्यासाठी लोखंडी रॉड, काठ्या, तलवार आणि खुरप्यांसारख्या शस्त्रांचा वापर केला. त्यामुळे हाणामारीत एकूण 9 जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पलूस पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
या हाणामारीप्रकरणात रमेश अनुगडे यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाल्याने दोघेही सध्या कारागृहात आहेत. कुटुंबियांवरील या कारवाईनंतर रमेश गंभीर नैराश्यात गेले होते. यानंतरही विरोधी गटातील दोन महिलांकडून त्यांना वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याची माहिती मिळते. या सततच्या छळामुळे त्यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.







