Sangli Crime : सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. सोमवारी 30 मार्च रोजी अवघ्या 24 तासांत तीन हत्येच्या (3 Murder) घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये दोन तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील वळसंग रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याचे समोर आले. गंभीर भाजल्यामुळे सुमारे 35 वर्षांच्या या अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप समोर आलेले नाहीत.

दुसरी घटना जत तालुक्यातील बिळूर येथे घडली. श्रीधर यळगोड नावाच्या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार जमीन वादातून घडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

तिसरी घटना सांगली शहरातील संजयनगर परिसरात घडली. सौरभ पवार नावाच्या तरुणावर संध्याकाळी धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी पळून जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. आरोपीकडून हत्यारही जप्त करण्यात आले आहे.
एकाच दिवशी तीन हत्येच्या घटना घडल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.







