पुणे: देशभरातील नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा आळंदी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी ‘म्युल अकाऊंट’ उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्याच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास केला.

तपासादरम्यान आरोपी सचिन काळे याच्या बँक खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(१), ३१८(४), ३(५) तसेच इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने स्वतःच्या नावावर विविध बँकांमध्ये एकूण नऊ खाती उघडल्याची कबुली दिली. या खात्यांमध्ये देशभरातील नागरिकांकडून ऑनलाइन फसवणुकीद्वारे उकळलेली रक्कम जमा केली जात होती. त्यानंतर ही रक्कम एटीएम आणि चेकच्या माध्यमातून काढून टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचवली जात होती.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील माहितीनुसार या आंतरराज्यीय टोळीने देशातील किमान ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यापैकी आरोपी सचिन काळेच्या नऊ बँक खात्यांमधूनच तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या रॅकेटमधील इतर साथीदार आणि मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. संपूर्ण आर्थिक व्यवहारांची साखळी उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा ओळखपत्रांचा वापर करू देऊ नये. पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे खाते संशयास्पद व्यवहारांसाठी उपलब्ध करून देणे किंवा इतरांच्या सांगण्यावरून पैसे काढून देणे हेदेखील गंभीर सायबर गुन्ह्यात मोडते. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारांपासून दूर राहून अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






