पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पोस्टमधील कथित अवमानकारक भाषेवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन असल्याचे म्हटले. शिव, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही होऊ शकतो; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाले, राजकारणात विचारांचा मुकाबला विचारांनी आणि मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर दिले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर घसरून महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. काँग्रेसने या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही या पोस्टचा निषेध करत, एका महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. ज्या पक्षात सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांसारख्या महिला नेत्या नेतृत्व करत आहेत, त्याच पक्षाच्या अधिकृत खात्यावरून अशी पोस्ट होणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने संबंधित पोस्ट तातडीने हटवून सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री नवाब मलिक यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत, महिलांचा सन्मान हा राजकारणापलीकडचा विषय असल्याचे सांगितले. कोणत्याही महिला नेत्याविषयी अवमानकारक भाषा वापरणे म्हणजे प्रत्येक महिलेचा अपमान असल्याचे ते म्हणाले. मतभेद असू शकतात, मात्र महिलांचा अवमान कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या पोस्टवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, काँग्रेसकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







