मुंबई: महाराष्ट्रात अन्नाची भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल आणि इतर दुग्धेतर पदार्थांपासून तयार होणाऱ्या ‘अॅनालॉग पनीर’वर आता एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या निर्णयानंतर राज्यात फक्त शुद्ध दुधापासून तयार केलेल्या पनीरचीच विक्री करता येणार आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या पनीरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, काही पनीर पदार्थांच्या किमती वाढू शकतात.

एफडीएने राज्यभर राबवलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत विविध ठिकाणांहून 308 पनीरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 109 नमुने दर्जाहीन किंवा भेसळयुक्त असल्याचे आढळले. यामध्ये 79 नमुने निकृष्ट दर्जाचे तर 30 नमुने थेट आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत स्पष्ट झाले.

तपासादरम्यान अनेक नमुन्यांमध्ये दुधातील नैसर्गिक स्निग्धांशाऐवजी पाम तेल, वनस्पतीजन्य तेल आणि इतर कृत्रिम घटकांचा वापर केल्याचे समोर आले. हे पदार्थ रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार करून ते पनीरसारखे दिसतील अशी बनावट केली जात होती. ग्राहकांना ते खरे पनीर असल्याचा भास होत असल्याने अनेकांची फसवणूक होत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दुग्धेतर पनीर नियमित खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दरम्यान, प्रशासनानेही भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.







