पुणे : राजधानी दिल्लीत पार पडलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आता आपली पुढील राजकीय आणि सामाजिक दिशा ठरवण्याच्या तयारीत आहे. यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. 5 आणि 6 तारखेला अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी ही दोन दिवसीय बैठक पार पडणार असून, याकरिता दिल्लीहून पक्षाची टीम संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे.

या बैठकीविषयी माहिती देताना पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, या दोन दिवसांत पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि प्रवक्ते एकत्र येऊन सविस्तर चर्चा करतील. तरुणांच्या या चळवळीला आगामी काळात कोणत्या मार्गाने पुढे न्यायचे, याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.तसेच 6 तारखेला पत्रकार परिषद घेऊन पक्षाची पुढील भूमिका जाहीर केली जाईल.

सौरव दास यांनी स्पष्ट केले की, या बैठकीत CJP चे 7 मुख्य सदस्य आणि चळवळीतील इतर सहयोगी सहभागी होणार आहेत. याशिवाय, झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलन अधिक तीव्र कसे करता येईल यावरही विचारमंथन केले जाणार आहे.दरम्यान, दुसरीकडे CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी दिपके यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्या तक्रारीनुसार दिपके यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अन्सारी यांनी केला असून, त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. अन्सारी यांनी आंदोलनादरम्यान केलेल्या कारवाईबद्दल दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले असून, अभिजीत दिपके हे स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
या दोन्ही घडामोडींमुळे आता संभाजीनगरमधील बैठकीत CJP काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे






