इंदापूर : आरोग्य हे बाजारात विकत मिळत नसल्याने आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्य साक्षर व सजग होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्य संदेश बहुउद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी केले.
इंदापूर ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये जेष्ठ नागरिक संघ, आरोग्य संदेश प्रतिष्ठान व समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित ‘निरोगी शरीर हिच खरी संपत्ती’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे व नंदकुमार गुजर, दत्तात्रय चांदणे यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल डॉ. संदेश शहा व डॉ. राधिका शहा यांचा फेटा घालून, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संस्थापक सदस्य सुभाष थोरात, भानुदास पवार, शहाजी बागल यांचा अभिष्टचिंतन सत्कार करण्यात आला.
डॉ. शहा पुढे म्हणाले, सध्या अन्न, हवा व पाणी प्रदूषित झाल्यामुळे आपले आयुर्मान घटत चालले आहे. मानसिक ताणतणाव, फास्ट फूड संस्कृती, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्व चिकित्सा पद्धतीच्या एकत्रित सर्वसमावेशक औषधोपचार पद्धती बरोबरच सिंपथी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर हे पंचमहाभुताने बनले असून शरीरात 72 टक्के पाणी व 22 टक्के अन्न आहे. त्यामुळे संतुलित आहार, भरड धान्य वापर, दैनंदिन व्यायाम, ध्यानधारणा या बरोबरच आयनीकृत म्हणजेच अल्कलाईन आयोनाईजड पाणी पिल्यास अनेक दुर्धर विकारांना प्रतिबंध होवून मानवी आयुर्मान दीर्घा युषी होण्यास मदत होईल. त्यासाठी आदर्श आरोग्य दिनचर्या तयार करून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी डॉ. राधिका शहा यांनी नगरपरिषदेचे, बिसलेरी पाणी व आयनी कृत पाणी यातील शास्त्रीय फरक उदाहरण देवून विशद केले. आयनीकृत पाण्याची प्रात्यक्षिके दाखवली. या पाण्यामुळे कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब, मूतखडे आदी विविध दुर्धर आजार बरे होण्यास मदत होते. कोरोना आजारामुळे सर्व औषधोपचार पद्धतीच्या तसेच आपल्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात या पाण्याचा नित्य वापर करून आपण आपल्या कुटुंबाचे, समाज व मित्र परिवाराच्या आरोग्याचे शिल्पकार होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रमोद भंडारी यांनी केले तर प्रास्ताविक नंदकुमार गुजर यांनी केले. सुत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभाष महाजन यांनी मानले.
यावेळी अशोक गानबोटे, सुभाष थोरात, भानुदास पवार, भीमराव वणवे, पांडुरंग जगताप, कृष्णा ताटे, इंद्रेश्र्वर पलंगे, सलीम शेख, जावेद मोमीन, संतोष जामदार यांच्यासह जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.