पुणे : विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार रविवारी (दि. ६) उघडकीस आला. याप्रकरणी मंजुषा मकरंद शेटे (वय ५७, रा. छाया सोसायटी, भक्ती मार्ग) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विधी महाविद्यालय रस्ता येथील छाया सोसायटीत चंदनचोरांच्या टोळीने शनिवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने चंदनाचे झाड कापून नेले.
शहरातील सोसायटी, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याचे प्रकार गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, तसेच प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे पळवली आहेत. तसेच, प्रभात रस्त्यावरील बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेले. तसेच, खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातूनही या टोळीने चंदनाची झाडे पळवली.