पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून चंदन चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे कापून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागातील अधिकारी जगन्नाथ शंकर खरमाटे (वय ५८, नवी सांगवी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनस्पती शास्त्र विभागाच्या आवारात उद्यान आहे. उद्यानात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेली. त्यानंतर २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज पुतळ्याशेजारी असलेली चंदनाची तीन झाडे कापून नेण्यात आली. चतुःशृंगी पोलिसांकडून चंदन चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. विद्यापीठाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.