पुणे : शनिवारी राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे उपस्थित होते. आयोगाच्या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे ठरवून द्यावीत, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन राज्य मागासवर्गीय आयोगाला दिले. तसेच आयोगाला राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही यावेळी संभाजीराजे यांनी केली आहे.
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानांवर संभाजीराजेंनी भाष्य केले. ‘शुक्रवारी केलेल्या भाषणात भुजबळ यांनी सर्व मर्यादा सोडल्या. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवर जाऊन भाषण केले. मी अडीच वर्षांपूर्वी भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं वारसदार म्हटले. त्याचा आज मला पश्चात्ताप झाला’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मनोज जरांगे पाटील हे नेहमी शांतपणाने आंदोलन करायचे, ओबीसी आणि मराठा एकत्रच आहेत असं बोलताना दिसले आहेत’, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.