पुणे : रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढतच चालली आहे. हे फेरीवाले प्रामुख्याने खाद्यपदार्थांची विक्री करतात. त्यांच्याकडील खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे नसते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे सुरक्षा दलासह वाणिज्य विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामध्ये ५६० फेरीवाल्यांना पकडून त्यांच्याकडून ३ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या वाणिज्य विभागाने गाड्या, स्थानके आणि फलाटावर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर या प्रमुख स्थानकांवर कारवाई करण्यात आली. विनापरवाना खाद्यपदार्थ, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.
या मोहिमेमध्ये २७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत तब्बल ५६० फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील ३५१ फेरीवाल्यांवर न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून ३ लाख १७ हजार ४२५ रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तसेच १ हजार ९४५ पाण्याच्या बाटल्या फेरीवाल्यांकडून जप्त केल्या आहेत. एवढंच नाही तर रेल्वेच्या अधिकृत स्टॉलवर खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानक परिसरात देखील अनेक विक्रेते छापील कमाल किमतीऐवजी अधिक पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्याचबरोबर अनधिकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केली जात आहे. अशा अनेक तक्रारी अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची लूट करणारे विक्रेते आणि फेरीवाले यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.