देहूगाव : संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आषाढी पायी वारी २०२४ पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरवात करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा शुक्रवार २८ जुन रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी २४ जून रोजी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने या सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
यंदाचा पालखी सोहळा कडक उन्हाळा आणि निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होत आहे. असं असलं तरी भाविकांना व वारकऱ्यांना याचा फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे यंदा पालखी सोहळा नेहमीप्रमाणेच उत्साहात होण्याची शक्यता आहे. तसेच यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे हे या विश्वस्त मंडळाचे शेवटचे वर्ष असल्याने यंदाचा पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल केशव मोरे, माणिक महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लोणी काळभोर येथील मुक्काम नवीन पालखी तळावर
लोणी काळभोर ते यवत हे सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथे सर्व दिंड्या बारस सोडून निघत असतात. उरुळी कांचन येथे दुपारच्या विश्रांतीच्या वेळी गावात पालखी जाऊन येण्यासाठी दिड तास लागतो. त्यामुळे येथून पालखी निघण्यास उशीर होत असल्याने यवत येथील मुक्कामी पोहचण्यासाठी उशीर लागतो.
यामुळे उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा अशी विनंती करणार आहे. त्याच प्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली आहे.