पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा पाच जानेवारी रोजी दिवसाढवळ्या कोथरूड परिसरातील सुतारदऱ्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला. प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडल्या होत्या. आता या प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली असून साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे दोघांनी 17 डिसेंबर रोजी आणखी एकावर गोळ्या झाडल्या होत्या. शरद मोहोळचा खून करण्यासाठी मदत न केल्याने त्याच्यावर या आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या. पुण्यातील भूगाव परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय सुतार (वय 27, रा. भूगाव) याला आरोपी मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खुनात मदत करण्यासाठी बोलावून घेतले होते. 17 डिसेंबर रोजी नामदेव कानगुडे याने अजय सुतार याला भूगाव येथील त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर या दोघांनी त्याला आम्ही शरद मोहोळचा खुन करणार असून त्यासाठी मदत करण्यास सांगितले. मात्र, अजय सुतार याने त्यांना नकार दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याने अजय सुतार याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सुतार याच्या पायाला लागली.
दरम्यान गोळ्या लागल्यानंतर या आरोपींनी अजय सुतार याला रुग्णालयात दाखल केले. तसेच उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुतार याने आजपर्यंत याविषयी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, शरद मोहोळच्या खुनानंतर आरोपींनी यापूर्वी गोळीबार केल्याचे तपासात माहिती पुढे आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करून पौड पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे.