पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करुन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. पतीकडून होत असलेल्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यानंतर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार मंगळवारी 2 जुलै रोजी धनकवडी येथे घडला आहे.
शिवानी दिपक दामगुडे (वय-24 रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती दिपक विठ्ठल दामगुडे (वय-30) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 115(2), 352, 351(2(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील झाली आहे. या प्रकरणी शिवानीचे वडील काशिनाथ काळु राऊत (वय-50 रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (दि.3) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह 2019 मध्ये दिपक दामगुडे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर आरोपी पती शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करत असे. तसेच तिला वारंवार शिवीगाळ करुन सोडून देण्याची धमकी द्यायचा. पतीकडून सतत होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.