हडपसर : मतदारसंघातील पोलिसठाणी ही नागरिकांच्या सुरक्षेची केंद्रबिंदू आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या सुरक्षिततेचा मोठा ताण यावर येत होता. मी महिला व ज्येष्ठांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहे. त्यासाठी हडपसर, वानवडी, कोंढवा आदी पोलिसठाण्यांचे विभाजन करून फुरसुंगी व काळेपडळ ही दोन नवीन पोलिसठाणी मंजूर करून आणली आहेत. त्याअनुषंगाने मतदारसंघातील महिला व ज्येष्ठांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला मी सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहे, असे मत महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केले.
मांजरी परिसरात दोन वर्षांपूर्वी कोयता गँगच्या उपद्रवामुळे सामान्य नागरिकांना अनेकदा दहशतीशी सामना करावा लागला आहे. त्याबाबत चेतन तुपे पाटील यांनी विधानसभेमध्ये सतत आवाज उठवून पोलिस यंत्रणेचे लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधले. पोलिसांनी तात्काळ कोयता गँगच्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. त्यातील अनेक गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे उपद्रव कमी झाला आहे.
चेतन तुपे पाटील म्हणाले, “नागरिकांची सुरक्षितता विचारात घेता हडपसर, कोंढवा, वानवडी, मांजरी येथील महत्त्वाच्या भागांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे उभारून पुढील काळामध्ये ही सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील. सीसीटीव्हींद्वारे वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच, शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलीस काका ही संकल्पना अधिक परिणामकारक पद्धतीने राबवून विद्यार्थी व युवक युवतींना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तपास यंत्रणेसाठी पाठपुरावा करण्यात येईल.’
मी आजपर्यंत कधीही कोणत्याही गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो नाही. अधिकाऱ्यांना एखादे विशिष्ट काम करण्यासाठी कधीही दबाव टाकला नाही. पोलिसांनी नागरिकांचे मित्र म्हणून राहावे, यासाठी माझा कायम पुढाकार राहिला आहे. पोलिस हे नागरिकांचे मित्र बनावेत, नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याची खबरदारी मी घेईन, असेही आमदार चेतन तुपे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी सय्यदनगर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले.