पुणे : अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीची सुखरूप सुटका केल्याने, जवानांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील एनआयबीएम रस्त्यावरील दोराबजी मॉलसमोर ही घटना घडली. या घटनेत मुलगी ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडली. प्रसंगावधान राखत अग्निशामक दलाच्या जवानांनी मुलीला बाहेर काढले.
या घटनेतून वाचलेल्या मुलीचे नाव इनसीया इसाक इडतवाला (वय १६, रा. कोणार्कपूरम, कोंढवा) असे आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर दोराबजी मॉल आहे. या मॉलच्या समोर पाण्याच्या तीन मोठ्या टाक्या बांधल्या आहेत. त्यापैकी एका रिकाम्या असणाऱ्या ४० फूट खोल टाकीमध्ये इनसिया पाय घसरून पडली.
दरम्यान, मुलगी टाकीत पडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना दिली. जवानांनी घटनेचे गांभीर्य जाणून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलातील अधिकारी कैलास शिंदे, जवान अनिकेत गोगावले हे दोघेही दोरी आणि शिडीच्या सहाय्याने टाकीत उतरले. टाकी खोल असल्याने सर्वत्र अंधार होता. जवानांनी मुलीला धीर दिला. उंचावरुन खाली पडल्याने इनसीयाला दुखापत झाली होती. त्यामुळे दोरी आणि शिडीच्या साह्याने तिला हळूवारपणे बाहेर काढण्यात आले.
इनसिया सुखरूप बाहेर आल्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसंगावधान राखत मुलीची सुखरूप सुटका केल्याबद्दल जवानांच्या कामगिरीचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.