पुणे : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाउस) यांना जोडणारा साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तो पाडण्याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेत बैठक झाली असून, सोमवार (दि. २३) पासून या कामाला वेग येणार असून या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना याबाबत कळविण्यात आले आहे. त्यांनी सहकार्य न केल्यास पोलीस कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे.
साधू वासवाणी पूल पाडण्यासाठी रेल्वेकडूनही ब्लॉक घेण्यात आला असून, या कामासाठी मुंबईतून क्रेन मागविण्यात आली. कोरेगाव पार्क ते कॅम्प परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर ‘रेल्वे ट्रॅक’ आहेत. या ‘रेल्वे ट्रॅक’वरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी साधू वासवानी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. तो नेमका कधी आणि कोणी बांधला याची कोणतीही अधिकृत माहिती महापालिकेच्या दप्तरी नाही. तो धोकादायक बनल्याने गेल्या वर्षभरापासून त्यावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
महापालिकेने हा उड्डाणपूल धोकादायक बनल्यानंतर त्यावर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेकडून गेले वर्षभर त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तरीही तो पूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने चारपदरी पूल बांधण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे.