राहुलकुमार अवचट
यवत : श्रावणमास निमित्त स्वर्गीय आमदार कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व कीर्तन महोत्सव सांगता समारंभ आज यवत येथील हर्षवर्धन मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प पुंडलिक महाराज देहूकर यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.
यावेळी प्रस्ताविक करताना आमदार राहुल कुल म्हणाले की, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आपल्या दौंड तालुक्यातून जाते. आपल्या दौंड तालुक्याला देखील मोठा सांप्रदायिक वारसा लाभला असून तालुक्यातील गायक, वादक, भजनी मंडळांना व्यासपीठ मिळावे या हेतूने भजन स्पर्धाचे व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील २५० हून अधिक मंदिराच्या सभामंडप बांधकाम जीर्णोद्धार, मंदिरांसाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत निधी, मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणे यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराला वन पर्यटनमधुन निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तर श्री क्षेत्र पंढरपूर येथे दौंड तालुक्याचे वारकरी भवन नसून भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे वारकरी भवन उभारणार असल्याचे तसेच ह.भ.प पुंडलिक महाराज देहूकर यांनी मागणी केल्याप्रमाणे रोटी घाटात सद्गुरू नारायण महाराजांचे स्मारक उभारणार असल्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी उपस्थितांना दिले आहे.
या स्पर्धेत एकूण ८० भजनी मंडळानी सहभाग घेताला. प्रथम क्रमांक स्वामी चिंचोली येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, द्वितीय क्रमांक राजेगाव येथील श्री. राजेश्वर भजनी मंडळ तर तृतीय क्रमांक नानगाव येथील श्री. सावतामाळी भजनी मंडळ यांनी पटकाविला. तर डाळिंब येथील श्री. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, गोपाळवाडी येथील स्वरांगण भजनी मंडळ, नांदूर येथील बोराटेवस्ती भजनी मंडळ, केडगाव येथील श्रीराम भजनी मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विभागीय विजेते म्हणून कामटवाडी येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, खडकी येथील भैरवनाथ भजनी मंडळ, पाटस येथील नागेश्वर भजनी मंडळ , वडगाव बांडे येथील संत यादव बाबा भजनी मंडळ, खोर येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, खामगाव येथील यादववाडी भजनी मंडळ, पारगाव येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ यांची निवड करण्यात आली.