धामणी : येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त म्हाळसाकांत खंडेरायाच्या दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पुणे व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धामणीच्या म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात सोमवारी पहाटे (ता. १८) चंपाषष्ठीच्या मूहर्तावर देवाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाली. त्यानंतर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. मंदिर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. दर्शनासाठी महिला भाविकांची लक्षणीय गर्दी होती. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानच्या मंदिरात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे चंपाषष्ठीला सोमवारी भल्या पहाटे चार वाजता श्री कुलस्वामी खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक, चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिंद्र वाघ आणि देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे, भगत, वाघे यांच्याकडून करण्यात आला.
विधीवत पूजा, पुरणपोळी, साजुक तूप, दूध खसखसची गोड खीर, सारभात, कुरडई, पापडी अशी पंचपक्वानांचा आणि वांग्याचे भरीत, रोडग्याचा नैवेद्य देवाला अर्पण केला. त्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आली. या वेळी धामणी, लोणी, खडकवाडी, गावडेवाडी, महाळूंगे पडवळ, तळेगांव ढमढेरे, अवसरी खुर्द, संविदणे येथील मानकरी, वाघे व वीर मंडळी व सेवेकरी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरात सकाळी नऊ वाजता ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे आमदाबादकर (शिरूर) यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी एक वाजेपर्यंत चार हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाची व्यवस्था खंडोबा मंदिर ट्रस्ट धामणी, पहाडदरा, शिरदाळे, ज्ञानेश्वरवस्ती येथील ग्रामस्थांनी पाहिली.