पुणे : पुण्यातील मांजरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पा सेंटरमध्ये येऊन एका व्यक्तीने आयुर्वेदिक मसाज घेतला त्यानंतर खिशातील पैसे चोरीला गेले म्हणत साथीदारांना बोलावून घेऊन स्पा सेंटरची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना मांजरी येथील राजतारा कॉम्प्लेक्समधील लक्झरी स्पा सेंटर मध्ये शुक्रवारी 18 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी विनोद रावसाहेब लोंढे (वय-३४, रा. राजतारा कॉम्प्लेक्स, मांजरी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी पप्या कांबळे व त्यांच्या ४ ते ५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद हे लक्झरी स्पा सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. पप्या कांबळे हा शुक्रवारी सायंकाळी स्पा सेंटरमध्ये ग्राहक म्हणून आला होता. आरोपीने आयुर्वेदिक मसाज घेतला. त्यानंतर त्याने त्याच्या खिशातील २७ हजार रुपये कोणीतरी काढून घेतले, असे म्हणून आरडाओरडा केला. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ केली. विनोद यांनी आरोपीची समजूत काढत असताना त्याने फोन करुन त्याच्या साथीदारांना स्पा सेंटरमध्ये बोलावले.
दरम्यान, आरोपीचे ४ ते ५ साथीदार हातात कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. स्पामधील काऊंटरवरील कॉम्प्युटर, समोरील काच, साईन बोर्ड याची तोडफोड करुन मोठे नुकसान केले.स्पा सेंटरच्या बाहेर येऊन निघून जात असताना आजू बाजूच्या दुकानदारांकडे पहात जर तुम्ही यांना मदतीला आला किंवा पोलिसांना कळविले तर तुमचे पण काही खरे नाही,असे म्हणत धमकी दिली. तसेच त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवत आरडाओरडा करुन तेथील परिसरात दहशत पसरविली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.