लोणी काळभोर, (पुणे) : आपल्या देशात गुणवत्तेची काही कमतरता नाही. अनेक मुलांनी लहान वयातच वेगवेगळे विक्रम केले आहेत. असाच पुण्यातील एका 8 वर्षांच्या मुलाने देखील एक थक्क करणारा विक्रम केला आहे.
साद अजित इनामदार (रा. शेवाळवाडी, ता. हवेली) या चिमुकल्याने डोळ्यावर पट्टी बांधून जादुई कमाल केली आहे. सादने अवघ्या 7 मिनिटे व 20 सेकंदात रंगांसह 72 वस्तू ओळखून मॅजिक, इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या विक्रमामुळे सादचे पुणे जिल्ह्यात सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
साद हा कॅम्प येथील सेंट पॅटरीकस हा शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे. सादचे वडील अजित इनामदार मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीत शिपाई म्हणून काम करतात. तर आई समीना या गृहिणी आहेत. सादने डोळ्यांवर पट्टी बांधून रंगांसह जास्तीत जास्त वस्तू ओळखण्याचा विक्रम केला आहे. त्याने 7 मिनिटे आणि 20 सेकंदात रंगांसह 72 वस्तू ओळखल्या. साद त्याच्या कलेच्या माध्यमातून सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. त्याची सर्वात प्रथम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये फेब्रुवारी 2024 ला नोंद झाली होती.
साद च्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेल्या नोंदीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. त्यानंतर आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी सादच्या घरी आले, पदाधिकाऱ्यांनी सादची प्रत्यक्षात परीक्षा घेतली. आणि सादची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व मॅजिक बुकमध्ये एकाचवेळी विक्रमाची नोंद झाली आहे.
दोन जाड कापडी पट्ट्या डोळ्यांना बांधून उपस्थित लोकांना साद हा त्याच्या हातात दिलेल्या वस्तू फक्त हाताने स्पर्श करुन वस्तू, रंग, कपडे, बॅग, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बसकार्ड यांचा रंग तसेच त्यावरील नंबर याची अचूक माहिती सांगतो. त्याचबरोबर मोबाईलच्या स्क्रीनवरील फोटो देखील तो बरोबर ओळखतो. तसेच डोळे बंद करून सायकल व स्केटिंग करतो. त्याची ही अद्भुत क्षमता पाहून पाहणारे लोक थक्क होत आहेत. त्यांना डोळ्यावर विश्वास बसत नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात साद इनामदारची भेट घेतली. सादचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साद इनामदारचे होतंय सर्वत्र कौतुक
सादचा जन्म हा सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानादेखील आई-वडिलांनी त्याची कला जोपासण्यासाठी प्रयत्न केला आहे. एखाद्या व्यक्तीला डोळ्यांवर पट्टी बांधून चालणे कठीण होत असते. मात्र साद हा डोळ्यांवर पट्टी बांधून स्केटिंगसारखे खेळ खेळतो. तसेच सादने ही कला शिकण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. सादने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सादने हे तिन्ही विक्रम नोंदविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एवढ्या लहान वयात तिन्ही रेकॉर्डमध्ये स्थान मिळणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. हे त्याच्या मेहनतीचे हे फळ आहे. आम्ही त्याला केवळ मार्गदर्शन केले आहे. त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीही आम्ही देत आहोत. त्याने नोंदविलेल्या विक्रमाबद्दल नातेवाईकांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा देत आहेत. त्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याने मन भारावून गेले आहे.
– अजित इनामदार (सादचे वडील)