पिंपरी : एस. के. एफ. इंडिया, चिंचवड या कंपनीत व्यवस्थापन आणि एस. के. एफ. बेअरिंग एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी ६० वर्षांची वेतन करार उशिरा होण्याची परंपरा मोडीत काढून अगोदरचा वेतन करार संपण्यापूर्वी २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी १७ वा ऐतिहासिक वेतन करार संपन्न झाला. एस. के. एफ.च्या कामगारांना सरासरी २४ हजार तर जास्तीत जास्त २७ हजार रुपये वेतनवाढ मिळवून देण्यात संघटना यशस्वी झाली असून, सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उद्योग क्षेत्रातील कराराची प्रथा पाहता बहुतेक कंपन्यांमध्ये चार टप्प्यात वेतन करार होतो. व्यवस्थापन आणि युनियनचे पदाधिकारी यांच्या समन्वयातून जुन्या कामगारांना पहिल्या महिन्यापासून संपूर्ण वेतनवाढीचे फायदे देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. टी. एम. ग्रेडमध्ये काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रूपये वेतनवाढ देण्यात आली आहे. एच.आर. ग्रेडमधील जुन्या कामगारांना २५ वर्षे सेवेसाठी १० ग्रॅम सोने, ३० वर्षांसाठी २० ग्रॅम सोने ही स्कीम बऱ्याच वर्षांपासून सुरू असून, त्यात काहीच बदल न करता या वर्षापासून ३५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना २५ हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. तसेच टी. एम. ग्रेडसाठी १० वर्षे सेवा २० हजार रुपये, १५ वर्षे सेवा ३० हजार रुपये, २० वर्षे सेवा ४० हजार रुपये, २५ वर्षे सेवा ५० हजार रुपये, ३० वर्षे सेवा ६० हजार रुपये, ३५ वर्षे सेवा ७० हजार रुपये, ४० वर्षे सेवा ८० हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. किरकोळ रजेत एक, वैद्यकीय रजेत एक, पितृत्व रजेत दोन, विशेषाधिकार रजेत सात अशी वाढ करून अंत्यसंस्कार निधी ८ हजार रुपये, विशेष निवृत्ती प्रोत्साहन भत्ता २६ हजार रुपये तसेच २९० दिवस हजर राहणाऱ्या कामगारांना १० हजार रुपये बक्षीस देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
वेतन करारावर एस. के. एफ. व्यवस्थापनाकडून शैलेश शर्मा (डायरेक्टर), प्रशांत हांडे (फॅक्टरी हेड), मंजुनाथ करीकट्टी (डी. जी. एम. एच. आर.), राजेंद्र ताटे, मोहन जगताप, युवराज जाधव, राम नलावडे, जेकब वर्गीस, अनंत देवकाते तसेच एस. के. एफ. बेअरिंग एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अध्यक्ष सुनील आव्हाळे, जनरल सेक्रेटरी साजिद पठाण, उपाध्यक्ष किशोर कदम, विक्रांत जाधव, जॉईंट सेक्रेटरी रोहित कांचन, खजिनदार मयूर पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
वेतन कराराविषयी प्रतिक्रिया देताना एस. के. एफ. युनियनचे पदाधिकारी म्हणाले की, “एस. के. एफ. व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिका, एस. के. एफ. युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय आणि त्यांना युनियनच्या सर्व सभासदांचा खंबीर पाठिंबा यामुळेच हा करार वेळेच्या अगोदर पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.” या वेळी एस. के. एफ. कामगारांकडून कंपनी प्रवेशद्वारावर भंडारा उधळून या ऐतिहासिक कराराचा जल्लोष साजरा करण्यात आला.