पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना थेट निधी वाटपावरुन लक्ष्य केलं. त्यानंतर, पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातूनही सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं. यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आहे.
1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणली आहे. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टायफंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा, असं अमोल कोल्हें म्हणाले होते. तसेच, काहींनी पिंक कलरला पसंती दिली आहे, असं म्हणत जयपूरचा दाखलाही अमोल कोल्हे यांनी दिला होता.
या सर्व टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतःच्या घरासमोरील रस्ता देखील बनवू न शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नका. त्यामुळे गुलाबी स्वप्नांवर एक शब्दही न काढलेले बरे. तुमची लोकसभेतील सूज विधानसभेत उतरवू, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे. यावेळी रुपाली चाकणकर बोलत होत्या.