पिंपरी : काही दिवसांपासून काळाखडक एसआरए प्रकल्प योजनेला स्थगिती मिळाल्याची माहिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने पात्र झोपडपट्टीवासियांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रकल्पाला कोणतीही स्थगिती नसल्याचा अधिकृत पत्राद्वारे खुलासा केल्याने झोपडपट्टी धारकांचा जीव भांड्यात पडला आहे.
वाकडमध्ये काळखडक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला काही संघटनांकडून विरोध करण्यात येत असून प्रकल्पाला स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत मागणीचे पत्र तक्रार निवारण समितीकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले. दरम्यान या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याची अफवा होती. हि बाब लक्षात आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपअभियंता यांनी काळखडक रहिवाशी संघाला पत्र पाठवून अधिकृत खुलासा केला. मे. जय एंटरप्रायजेस यांनी या कार्यालयाकडे सादर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून कोणत्याही न्यायालयाचे, प्राधिकरणाचे स्थगिती आदेश नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.