पुणे: पुण्यातील एका सोसायटीत जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून दोन जणांनी सोसायटीतील सभासदांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना धायरी भागातील सोसायटीमध्ये 11 एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्लिका समीर पायगुडे-गाजरे आणि समीर मनोहर पायगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुण्यातील सिंहगड रोड भागातील धायरी येथील रिद्धी सिद्धी पॅरडाइज या सोसायटीत गेल्या बारा वर्षांपासून राहत आहेत. याच सोसायटीत ते सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. याच सोसायटीमधील एका फ्लॅटधारकाने सोसायटीतील पार्किंगमध्ये 15-20 दिवसांपूर्वी पत्रा लावून फॅब्रिकेशनचे काम सुरू केले होते. आरोपींना राहण्यासाठी हा फ्लॅट घरमालकाने दिला होता. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत सोसायटीने त्या फ्लॅट धारकाला बांधकाम काढून टाकण्याबाबतची नोटीस बजावली. नोटीस दिल्यानंतर बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने 13 एप्रिल रोजी सोसायटी सभासदांची पार्किंगमध्ये मीटिंग आयोजित करून सर्वांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे ठरवले.
जमलेल्या महिला सभासदांचे केस ओढले
दरम्यान, संबंधित अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत सोसायटीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी या जागेची पाहणी केली. बांधकाम काढण्यापूर्वी यातील आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याक्षह सोसायटीतील इतर महिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर या वरवरच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तेवढ्यात, तुम्ही आमचं ऐकत नाही काय, थांबा तुम्हाला दाखवतो असे म्हणत समीर पायगुडे हा हातात लोखंडी रोड घेऊन फिर्यादी अनिल दरोली यांच्यावर धावून गेला. त्यानंतर त्याने तेथे जमलेल्या महिला सभासदांचे केस ओढले आणि इतरांना मारहाण करायला सुरुवात केली. आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे या महिलेने सुद्धा महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली.
दिलेल्या फिर्यादिनुसार, याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74, 118(1), 333, 352, 351(2), 351(3), 324(2) आणि 281नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.