पुणे : दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली जाते. यामध्ये सोने, चांदी, कपडे आणि इतर वस्तूंची विक्री वाढली आहे. याच दस-याच्या मुहूर्तावर 10,601 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यासाठी वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे.
पुणे आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 10,601 इतक्या नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये 6707 दुचाकी, 2922 चारचाकी, 346 मालवाहू वाहने, 261 ऑटो-रिक्षा, 20 बस, 231 टॅक्सी आणि 114 इतर प्रकारची वाहने आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहन नोंदणींच्या अभ्यासानुसार, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये घट झालेली दिसून येत आहे. 2023 मध्ये 6,144 दुचाकी आणि 3482 कारची नोंदणी झाली होती. तर यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर दुचाकींची नोंदणी थोड्या प्रमाणात वाढली आहे. परंतु फोर व्हिलर खरेदी करणा-यांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.
तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्येही लक्षणीय घट झालेली पाहावयास मिळाली आहे. यावर्षी फक्त 363 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर गेल्यावर्षी 2023 मध्ये 1031 नोंदणी झाल्या होत्या.