पुणे: शहरात प्रवासाच्या निमित्ताने येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून कार शेअरिंगसाठीचे एका खासगी अॅपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. या खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर अशा प्रकारच्या वाहनांवर आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई सुरू केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत सात ठिकाणे शोधून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे शहरात कार शेअरिंगसाठीचे एका खासगी अॅपपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. संबंधित वाहनचालक पुण्यातून कोणत्या शहरात जाणार आहे आणि त्याच्या कारमध्ये किती जागा आहे, ते त्या अॅपवर टाकले जात आहे. त्यानुसार प्रवास करणारे नागरिक त्या कारमधील सीटची ऑनलाईन बुकींग त्या अॅपवरून करतात. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे. तरीही अॅपच्या माध्यमातून ही वाहतूक वाढल्याच्या तक्रारी पुणे आरटीओकडे आल्या होत्या.
याबाबत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे आरटीओने खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी वाघोली, विमानगर, हडपसर, स्वारगेट, चांदणी चौक, नवले पूल अशी ठिकाणे निवडणूक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरटीओकडून वायुवेग पथकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. वायुवेग पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः डमी प्रवासी म्हणून खासगी अॅपवरून बुकिंग करावे, त्यामध्ये सर्व पुरावे गोळा करावेत. संबंधितांवर कारवाई करावी. खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दहा हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. तसेच, संबंधित गाडी जप्त देखील केली जाऊ शकते. तसेच, त्या गाडीमध्ये प्रवासी आढळून आल्यास प्रत्येक प्रवाशाला १०० रुपये टॅक्स आकारला जाऊ शकतो.