पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील आरटीई प्रवेशप्रक्रिया २०२५-२६ सोमवार पासून सुरवात होणार आहे. त्यानुसार १८ डिसेंबरपासून सर्व विनाअनुदान प्राप्त शाळांची ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. १० मार्चपर्यंत सर्व शाळांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्रक काढले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती याआधीच विभागाकडे तयार असून, काही नवीन शाळा, वाढलेल्या वर्ग तुकड्या आणि त्यातील वाढलेल्या प्रवेशाच्या जागांची माहिती काही दिवसांच्या आत जमविण्याचे नियोजन आहे. यानंतर लगेचच मुलांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीला सुरवात होईल.
राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, संस्थांनी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या सर्व प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. काहींनी थेट प्रवेश देऊन बाकीची सर्व प्रक्रिया करून घेतली आहे. अनेक महत्त्वाच्या शाळांमध्ये आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या जागाही काही शाळा याच कालावधीत आपल्याकडे आलेल्या प्रवेशातून भरून घेत असतात. यामुळे याच काळात आरटीईची प्रवेश प्रक्रियाही तत्काळ सुरू करण्याची मागणी आप पालक युनियनसह इतर पालक संघटनांनी केली होती. या मागणीपूर्वीच विभागाने आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शवली आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात दरवर्षी आरटीईचे सर्वाधिक प्रवेश होतात. यंदा ९७० शाळांमध्ये आरटीईच्या १७ हजार ५८८ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ४८ हजार १५५ अर्ज आले होते. त्यामुळे पहिली यादी आणि तीन प्रतीक्षा यादी मिळून पुणे जिल्ह्यात तब्बल १३ हजार ६६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. दरम्यान, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यात ७८ हजार ३९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले होते. उशिरा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सर्व फेऱ्यांनंतरदेखील २६ हजार ८४० जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.