-बापू मुळीक
सासवड : नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सासवड येथील पोलिसांनी शिस्त व संयमाचे दर्शन घडवत हा सोहळा उत्तमप्रकारे पार पाडला. त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे स्तुत्य काम रोटरी क्लब ऑफ पुरंदरने नुकतेच केले आहे.
सासवड पोलिस स्टेशनच्या आवारात आयोजित या कौतुक सोहळ्यास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील, अर्जुन चोरघे यांसह त्यांचे कर्मचारी व तालुक्यांतील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच पत्रकार बंधूंनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष अभिजित बारवकर यांनी अकरा दिवसांचा गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक, सद्गुरू नारायण महाराज यांचे निधन व अंत्यसंस्कार अशा विविध परिस्थितीत सासवड पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. रोटरीच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी रोटरी, पत्रकार व पोलिस यांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. याबद्द्ल उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सव काळात घ्यावयाची खबरदारी, नियम याविषयी योग्य नियोजन केल्याने हा उत्सव उत्तम पार पडला, अशी माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आपल्या भाषणात दिली. शांततेत मिरवणूक काढून तसेच गुलालाचा वापर न करता शिस्तीत विसर्जन मिरवणूक पार पडली, याबद्दल त्यांनी सर्वांचेच विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत ताकवले यांनी केले तर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर गुरव यांनी आभार मानले. सर्व पोलिस अधिकारी त्याचप्रमाणे गोपनीय विभागाचे रुपेश भगत, वाहतूक पोलिस कर्मचारी योगेश गरुड, सर्व महिला पोलिस कर्मचारी, सर्व पत्रकार यांना यावेळी शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. रोटरी क्लबचे सचिव ॲड. आनंद जगताप, खजिनदार प्रमोद धनावडे, डॉ. विनायक बांदेकर, डॉ. प्रविण जगताप, डॉ. सुमित काकडे, कृष्णा शेट्टी, अनिल उरवणें, तुषार जगताप, विश्वनाथ गायकवाड, संतोष गायकवाड, सचिन कुदळे, गुलाब गायकवाड, डॉ. उमाकांत ढवळे, प्रा संदिप टिळेकर या रोटरीच्या सदस्यांसह तालुका पत्रकार संघ अध्यक्ष योगेश कामथे व पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते