पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर आता रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढली गेली. मला अडचणीत आण्याच्या प्रयत्न केला जातोय, निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून मला नोटीस दिली जातेय का? मला माहिती आहे, पुढील २-३ महिन्यांत मला जेलमध्ये टाकले जाईल, असे आरोप रोहित पवारांनी केले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, पक्ष चोरी केल्यानंतर माझ्यावरील कारवाईला सुरुवात झाली. ईडीची यामध्ये काहीही चूक नाही. मी त्यांना सहकार्य केले आहे. आम्ही २२ फेब्रुवारी रोजी सर्व माहिती त्यांना दिली होती. विधानसभेत देखील मला अनेकांनी सांगितले, तू गप बस. मात्र, आम्ही या प्रकरणात कुठेही घाबरत नाही. ज्यांचे नाव दोषी म्हणून आहे, त्यातील ७० टक्के नावं भाजप, शिवसेना अजित दादांकडे आहेत. एकावरही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. मात्र आता, माझ्यावर केस झाली, मी लढणार आणि जिंकणारच आहे. पुढील २-३ महिन्यांत मला जेलमध्ये टाकले जाईल, असे आरोप रोहित पवारांनी केले आहेत.
कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अजून आलेली नाही. राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारामती ऍग्रो कंपनीचा जिथे मी संचालक आहे. एका सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. जप्तीची नोटीस आमच्याकडे पोहचली नाही. त्यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. अप्पासाहेब म्हणजे माझ्या आजोबांनी ही कंपनी तयार केली. नंतर वडिलांनी लक्ष दिले. कामगारांना सांगू इच्छितो घाबरून जायची आवश्यकता नाही. २००७ पासून मी लक्ष द्यायला सुरुवात केली. आठ हजार कर्मचारी आणि कामगार येथे काम करतात. राजकीय दृष्टीने कोणी बघत असेल तर तुम्ही लाखो लोकांच्या कुटुंबाशी खेळ करत आहात. ८ मार्च रोजी बारामती ऍग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस आली, मुळात ही प्रेस नोट चुकीची आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला.