पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर शुक्रवारी (ता. ५) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापेमारी सुरु केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आली. पथकाने एकूण ६ ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रोहित पवार अडचणीत आले आहेत.
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. यापूर्वी बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. ७२ तासांत प्लँट बंद करण्याची सूचना नोटिसमध्ये दिली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती मिळवली होती. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने आता मनी लॉन्ड्रींग प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. यामुळे बारामती अॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरी छापेमारी सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचे काका अजित पवार सध्या सत्तेत आहेत. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. याचवेळी पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी केली जात आहे. या प्रकरणात रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्याकडून प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.