पुणे : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार 2019 मध्येच भाजपात प्रवेश करणार होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील तटकरे यांनी हा दावा केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, रोहित पवारांना अनेकदा आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला. हडपसरमधून भाजपकडून उमेदवारी मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होता? 2019 ला विधासभेच्या निवडणुकीवेळी हे सुरु होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना स्थान मिळाले नाही.
म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपकडे कोण जाणार होतं हे माहिती आहे. ज्यांच्या मार्फत प्रवेश होणार होता, ते आज एकेठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी आता काय सांगावे की, भाजपमध्ये आम्ही जाणार होतो. पण आम्ही भाजपमध्ये गेलो नाहीत. आम्ही भाजपसोबत आहोत.
पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे काही घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे. जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं होतं. सरकार स्थापन करण्याची औपचारिकता राहिली होती. केव्हाही सरकार स्थापन होऊ शकलं असतं. दोन प्रमुख पक्ष सोबत लढल्यानंतर त्यांना कौल दिला होता. ते सरकार स्थापन करत नाहीत, तेव्हा आम्हाला सत्तेत जाण्याचा मार्ग दिसला. आम्हाला दोन्ही पर्याय दिले. भाजपचाही आणि शिवसेनेचाही होता. त्यातून महाविकास आघाडीचा पर्याय आला.