पुणे : मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही प्रचार करून भाऊ पार्थ पवार याचा बदला घेणार अहोत. अजित पवार पार्थ पवार याचा झालेला पराभव विसरले असतील, आम्ही अद्यापही त्याचा पराभव विसरलो नाही, असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही विचार सोडलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कालही बारणेंविरोधात लढलो आणि आजही लढत आहे. मागील निवडणुकीमध्ये मावळमध्ये मी पार्थसाठी प्रचार केला. पण दुर्दैवानं त्यांचा मोठा पराभव झाला. श्रीरंग बारणे विजयी झाले. लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंसाठी आता अजित पवार प्रचार करत आहेत. पण मी भाऊ म्हणून पार्थ यांच्या पराभवाचा बदला घेईन, असा निर्धार रोहित पवार यांनी केला आहे.
स्वत:च्या स्वार्थासाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडणारे अजित पवार आता स्वत:च्या लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंचा उमेदवारी अर्ज भरण्यास उपस्थित होते. लेकाचा पराभव त्यांनी पचवला का ते माहीत नाही. पण अजून त्यांना बरंच काही पचवायच आहे. त्यामुळेच ते बारणेंसाठी प्रचार करत आहेत. बारणेंनी पार्थचा केलेला पराभव मी अद्यापही विसरलेलो नाही, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.