Pune Prime News : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय वाजवी वेळेत घ्या असा निर्देश दिला आहे. या निर्णयाला सहा महिने उलटून गेले आहेत, तरीही विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक विधान केलं आहे. (Rohit pawar)
रोहित पवार म्हणाले, “मला एवढीच अपेक्षा आहे की, राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय संविधानाच्या बाजूने घ्यावा. राहुल नार्वेकरांनी अपात्रेबाबतच निर्णय घेण्यास बराच उशीर केला असून मला त्यांना फक्त एकच विनंती करायची आहे. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष सतत दिल्लीला जाऊन चर्चा करत असतील आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असतील, तर हे राज्यातील नागरिकांना आवडणारं नाही. ते लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेणार असतील तर शिंदे गट नक्कीच अडचणीत येईल, असं मला वाटतं.” असं रोहित पवार म्हणाले.(Rahul Narvekar
शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांचा लोकसभेपुरताच वापर
भाजपकडून दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. लोकांचा लोकसभेपुरताच वापर केला जाईल. त्यांचा उपयोग झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. सुरुवातीला नेत्यांना आणि सामान्य लोकांना आमिषे दाखवायची, मात्र जेव्हा प्रत्यक्षात आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा काही करायचं नाही. अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.