पुणे : बारामतीमध्ये अजित पवार यांनी जनतेला भावनिक साद घतल्यानंतर रोहित पवारांनी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दादा असे भावनिक आवाहन करतील असे वाटले नव्हते असे ते म्हणाले. आळंदीमध्ये सुधीर मुंगसे या त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटायला आले असता ते बोलत होते.
माझ्या कुटुंबीयांशिवाय इतर पवार कुटुंबीय माझा प्रचार करणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले होते. अजित पवार यांनी मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला आणखी काही मिळालं असतं असं वक्तव्य केलं, त्याचाही रोहित पवार यांनी समाचार घेतला. अजित पवार यांना अनेक पदं मिळाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता आणि आता ते भाजपबरोबर गेलेत ते पदासाठीच का ? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार बारामतीकरांना भावनिक साद देतील ही अपेक्षा नव्हती आणि अजित पवारांचा हा निर्णय लोकांना आणि कुटुंबालादेखील पटला नाही आहे. मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला वेगळं काहीतरी मिळालं असतं, असं अजित पवार म्हणाले. मात्र मंत्री, उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. राज्याचे प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. आता त्यांना अजून वेगळं काय पाहिजे? अजित पवार भाजपसोबत जाण्याचं कारण पद असेल तर विचारसरणी कुठे गेली?, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष भाजप करत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.