पुणे : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची त्याच्या निवास्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून निलेश लंकेंवर टीकेची झोड सुरु झाली आहे.
सेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत गजा मारणेने मदत केली, त्याचे आभार मानायला ही भेट होती का? असं मिटकरी म्हणाले. त्यानंतर निलेश लंके यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता आमदार रोहित पवार यांनी माफी मागितली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार म्हणाले, आहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश भाऊंच्या प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली ती योग्य घडलेली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना गजा मारणेबाबत माहिती नव्हतं.
त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कुठल्याही नेत्याने कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोक फॉलो करत असतात. जसं निलेश भाऊंनी माफी मागितली, तसंच मी सुद्धा माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला. कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु नये, अशी विनंती आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रविण धनवे यांच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरुन निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला काही लोकांनी थांबवून चहा पिण्यासाठी बोलवले. आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहित नव्हती. त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला. तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहितीही नव्हते. नंतर दोन तासांनी संबंधित व्यक्तीबद्दल माहिती कळाली. तो एक अपघात होता. कळत न कळत चूक झाली. गजा मारणेची भेट अपघाताने झाली असं लंके म्हणाले.