पुणे : आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. “पक्ष चोरी केल्यानंतर माझ्यावरील कारवाईला सुरुवात झाली. ईडीची यामध्ये काहीही चूक नाही. मी त्यांना सहकार्य केलं आहे. आम्ही 22 फेब्रुवारी रोजी सर्व माहिती त्यांना दिली होती, असं रोहित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते
रोहित पवार म्हणाले, विधानसभेत देखील मला अनेकांनी सांगितलं की तू गप बस. मात्र, आम्ही या प्रकरणात कुठे ही घाबरत नाहीत. ज्यांचे नाव दोषी म्हणून आहे, त्यातील 70 टक्के नावं भाजप, शिवसेना अजित दादांकडे आहेत. एकावरही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. मात्र आता, माझ्यावर केस आली मी लढणार आणि जिंकणारच आहे.
पुढील 2-3 महिन्यात मला जेलमध्ये टाकले जाईल, असे आरोप रोहित पवार यांनी केले आहेत. मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढली गेली. निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून मला नोटीस दिली जातेय का? मला अडचणीत आण्याच्या प्रयत्न केला जातोय, असे सवालही रोहित पवार यांनी केले आहेत.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अजून आलेली नाही. राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारामती ऍग्रो कंपनीचा जिथे मी संचालक आहे. एका सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. जप्तीची नोटीस आमच्याकडे पोहचली नाही. त्यांचे ट्विट पाहिल्यावर आम्हाला ही माहिती कळाली. जप्ती म्हणजे संपूर्ण जप्ती नाही एक सिंबोलिक आहे, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.