Rohit Pawar : पुण्यातील आंबेगाव तालुक्यात “वादा तोच, पण दादा नवा” या आशयाचे बॅनर झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांची जागा रोहित पवारांनी घेतली, असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हा फ्लेक्स लावला आहे. त्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बॅनरमुळं उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादाची जागा रोहित पवार घेत आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.
रोहित पवारांच्या फोटोसह “वादा तोच, पण दादा नवा”हे फ्लेक्स झळकले आहेत. त्याच भागात मंचरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत. मंचरमधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत.
कर्जत जामखेडला इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवण्याच्या तयारीत रोहित पवार आहेत, असा आरोप करत वळसे पाटलांनी अजित पवारांसोबत भाजपशी घरोबा केला होता. त्या आरोपाला रोहित पवार प्रतिउत्तर देतात का? हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अजित दादाच होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे पुण्याच्या दादांची जागा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.