पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा सुरु केली होती. पण आता ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, त्यांना साथ देणं गरजेचं आहे, त्यामुळे ही यात्रा स्थगित केली असल्याचं यावेळी आमदार रोहित पवारांनी म्हटलं. तसेच या मुद्दा सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी विशेष अधिवेशनाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकरालेल्या आंदोलानाची परिस्थिती आता अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती, राज्यातील आंदोलनाची परिस्थिती आणि युवकांची स्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक तरुणांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या देखील केली, या चिंताजनक परिस्थितीमुळे रोहित पवारांनी त्यांची यात्रा काही काळासाठी स्थगित केली.
गावबंदीमुळे यात्रा थांबवली नाही
मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर प्रत्येक गावात कोणत्याही नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे बॅनर्सही गावाबाहेर लावण्यात आले आहेत. परंतु, या गावबंदीमुळे यात्रा थांबवली नसल्याचं आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘आम्ही संवदेनशील आहोत. आमचीच मुलं आत्महत्या करतात. त्यामुळे आम्ही ही यात्रा पुढे घेऊन जाऊ शकत नाही.’
स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहायला हवा
आमदार रोहित पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, ‘महाराष्ट्रातील युवा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. या यात्रेचा आज सकाळचा टप्पा जिथे संपला तिथेच आम्ही थांबलो आहोत. पुढे गेलो नाही. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड सगळी कडचे पदाधिकारी येथे आले आहेत. सातत्याने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. पण, आता अशांत झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हायला हवा. त्यासाठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.’