पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडी चौकशीप्रकरणी खोटे आणि चुकीचे आरोप केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्याकडून हा दावा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडी चौकशीवरून रोहित पवार यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप विरोधक करत होते. तसेच ‘गल्ला मारला असेल तर चौकशीला सामोरे जावेच लागेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यावर चुकीचे किंवा खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी २९ जानेवारीला रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
नेमक प्रकरण काय?
रोहित पवार यांची काही दिवसांपूर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर गुलाबराव पाटील यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप केला होता. तसेच गल्ला जर मारला असेल, डल्ला खाल्ला असेल तर चौकशीला सामोरे जावेच लागेल, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले होते.
कायदेशीर कारवाई करण्याचा रोहित पवारांचा इशारा
दरम्यान, या चौकशीनंतर कोणी खोटे कींवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर रोहित पवार यांनी यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. काल २९ जानेवारीला पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.