पुणे: माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात अजित पवार यांनी येरवड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव झाल्यानंतर त्याची हस्तांतरण प्रक्रिया सुरु करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तसेच त्याला बोरवणकर यांनी विरोध केल्याचंही नमूद केलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील हे मुद्दे समोर येताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
माजी अधिकारी मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामधून अजित पवार यांच्यावर जमिनी देण्यावरून गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी स्वतः काही बांधकाम क्षेत्रात नाही. बोरवणकर यांनी काय आरोप केले, मला त्याबद्दल सांगता येणार नाही. जमीन कोणाची कोणाला दिली, त्या जमिनीचे काय केले याबद्दल राज्य सरकारने शहनिशा करावी. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.