पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलायला हवे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे द्वेष निर्माण केला जात आहे. याबाबत राज ठाकरेंनी बोलावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी बोलताना पुढे म्हणाले, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते गुणरत्न सदावर्ते यांनी हाणून पाडले. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असल्याचे रोहित पवार म्हणाले. ते सत्ताधारी लोकांना खेळवत ठेवत आहेत. स्पष्ट भूमिका सत्तेतील लोकांनी घेतली पाहिजे. सत्तेतील लोकांनी सांगावं की आम्हाला या गोष्टी जमणार नाही. त्यांना लाडकी खुर्ची जपायची आहे. सुपारी बाजांना यांना सांभाळायचे असल्याचेही आमदार रोहित पवार म्हणाले.
पुढे आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मी फॅन होतो. पण आता ते दिल्लीचा आदेश पाळत आहेत. भाजपला मतविभागणी करायची आहे. लोक त्यांना आता सुपारीबाज पक्ष म्हणत आहेत. पुढे सत्तेतील लोकांनाच उभं केलं जाईल. शेवटी भुमिका घेत आहेत. येत्या काळाता मतदार योग्य व्यक्तीला निवडून देतील, असे रोहित पवार म्हणाले.