पुणे : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. हेच थेरगाव (पिंपरी चिंचवड) येथील रोहित बाळासाहेब कोतकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. रोहितने जीएसटी विभागातील सहाय्यक राज्यकर आयुक्त (प्रथम वर्ग) पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रोहितने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणीक, शासकीय क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने जीएसटी विभागातील सहाय्यक राज्यकर आयुक्त (प्रथम वर्ग) पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. या परीक्षेत रोहित कोतकर याने यश संपादन करून सहाय्यक राज्यकर आयुक्त पदाला गवसणी घातली आहे.
रोहितचे वडील बाळासाहेब कोतकर हे अन्नसुरक्षा अधिकारीपदी कार्यरत आहेत. रोहितचे बालपण ताथवडे डेअरी फार्म परिसरात गेले. रोहितचे प्राथमिक शिक्षण वाकड येथील गुड सॅमारीटन स्कूलमधून झाले आहे. त्यानंतर आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहितची प्लेसमेंट हिंजवडी येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झाली होती.
दरम्यान, बाळासाहेब कोतकर हे अन्नसुरक्षा अधिकारीपदी कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेचे बाळकडू बालपणापासून मिळाल्याने रोहितने आपणही मोठे अधिकारी व्हावे, असे स्वप्न रोहितने पाहिले होते. हे स्वप्न रोहितला स्वस्थ बसू देत नव्हते. मग त्याने आयटी कंपनीला रामराम ठोकला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
रोहितने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु यशाचा रस्ता थोडासा खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र, रोहित हा अपयशाने खचला नाही. जिद्द मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. आणि जीएसटी विभागातील सहाय्यक राज्यकर आयुक्त (प्रथम वर्ग) पदाची परीक्षा पास होऊन यशाची गरुडझेप घेतली.
”या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, बहिण व मित्रपरिवार आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. स्पर्धा परीक्षाकडे येणाऱ्या नवीन उमेदवारांनी संपूर्ण विचार करूनच या क्षेत्राकडे यावं, वाढती स्पर्धा आणि दिवसेंदवस कमी होणारी पदे यामुळें या परीक्षेमध्ये यश मिळवणं कठीण होत चालंल आहे. मात्र तुमची खरच तयारी असेल, तर अपयश आले तर खचून जाऊ नये, अभ्यासात सातत्य ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल”.
रोहित कोतकर (सहाय्यक राज्यकर आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण)
रोहितच्या यशामुळे युवकांना मिळणार प्रेरणा
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले-मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु, रोहित कोतकर यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास करून यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना प्रेरणा मिळाली आहे. रोहितने आपल्या आईवडीलांच्या बरोबर मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्गाचे आभार मानले. कारण त्यांच्या संस्कारातून शिकण्याची संधी मिळाली व वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले, असेही रोहितने सांगितले आहे.