पिंपरी (पुणे) : पोलीस अंमलदाराच्या घरावर सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याने खळबळ उडाली. ही घटना रविवारी (दि. १३) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथे घडली. दरम्यान, दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले आहेत. अनिकेत पंडित दौंडकर (वय २५, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी ४२ हजार ५०० किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ हजार ५०० रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने अनिकेत यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले.