सासवड, (पुणे) : सासवडमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा व्यवस्था भेदून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचा ऐवज लंपास केला आहे. रात्री घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने, फर्निचर, रोख रक्कम तसेच घरातील कपडे देखील लुटून नेली आहेत. या घटनेने सासवडमधील सर्व सोसायट्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याबाबत सासवड येथील नाना धुमाळ पेट्रोल पंपाचे मालक नंदकुमार माधवराव धुमाळ (रा. वीर सध्या तरादत्त पार्क, फ्लॅट ६ रिलायन्स पेट्रोल पपांच्या मागे सासवड) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी सुनीता धुमाळ या दोन दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. फिर्यादी नंदकुमार धुमाळ हे रात्री घराचे सर्व दरवाजे बंद करून पेट्रोल पंप येथे झोपण्यासाठी गेले होते. शुक्रवारी (दि. २७) सकाळी उठून घरी आले असता घराच्या कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडलेले आढळले. तर आत आले असता त्यांना घराचे सेफ्टी डोअरचे कुलूप तोडलेले तसेच घरचा मुख्य दरवाजाच्या कडी कोयंडा तुटलेला दिसला. दरम्यान, घरातील सामान अस्ताव्यस्त असून बाहेरच्या हॉल मधील टिव्ही, टी पॉय, सोफा सेटच्या उशा चोरीला गेल्याचे दिसून आले.
त्यानंतर बेडरूममध्ये गेले असता तेथील सामान अस्ताव्यस्त असून कपाटातील डायमंडचे सुमारे १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याच्या १ लाख रुपये किमतीच्या तीन जोड, १ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीचा दिवा, चांदीचे भांडे, साड्या, पंजाबी ड्रेस, तसेच रोख रक्कम ७० हजार रुपये, असा एकूण ५ लाख ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले.
याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.