पिंपरी : अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चार चोरट्यांनी भर दिवस सराफी दुकानात पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हिंजवडी येथे घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असतानाच चोरट्यांची मात्र घोर निराशा झाली. सोन्याचे समजून चोरट्यांनी अवघे १७ हजार रुपयांचे बेटेक्सचे दागिने लुटले असून कष्ट केले अन् वाया गेले असा प्रत्यय आला. दरम्यान, या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी सुधाकर पोपट पाटील (वय २५, रा.दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पाटील यांचे हिंजवडी येथे लक्ष्मीचौक परिसरात शिवमुद्रा ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दरम्यान, सव्वा दहाच्या सुमारास तीन चोरटे त्यांच्या दुकानात घुसले, तर एक साथीदार बाहेर थांबला. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर इतर साथीदार दुकान लुटू लागले. चोरट्यांनी सोन्याचे समजून बेंटेक्सचे बोरमाळ, पेंडल, नेकलेस, मंगळसूत्र, टॉप्स असा १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज बॅगेत भरून पळ काढला.